लातूर : विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पळविलेल्या चार दुचाकींसह टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी पळविण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या अट्टल गुन्हेगारांचा शोध घेतला. याबाबत पोलिस पथकाच्या हाती काही माहिती लागली. चोरीतील दुचाकी दोन गुन्हेगार विक्रीसाठी लातुरतील बाभळगाव चौक परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली.
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने धाव घेतली. बाभळगाव चौक परिसरात रस्त्यावर दुचाकीसोबत थांबलेल्या एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मोईन अकबर चौधरी (वय २२, रा. चिल्ले कॉम्प्लेक्स जवळ, शास्त्रीनगर लातूर) असे त्याने नाव सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. ताब्यातील दुचाकी काही महिन्यापूर्वी बाभळगाव रोडवरील एका पेट्रोल पंपासमोरून मी आणि अन्य एक अल्पवयीन बालकाने चोरल्याची कबुली दिली.शिवाय, अखिल महबूब शेख (रा. परळी जि. बीड) याने कोठूनतरी चोरून आणलेल्या आणखीन तीन दुचाकी विकण्यासाठी आमच्याकडे दिल्या असल्याचे सांगितले. आरोपीकडूनचोरीतील चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बीड येथील आरोपीचा शोध सुरू असून, दोन गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. ही कारवाई स्थागुशाचे पो.नि. संजीवन मिरकले, नितीन कटारे, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, राजेश कंचे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली आहे.