औरंगाबाद : चितेगाव येथील धान्याचे गोदाम फोडून ८० क्विंटल तूर चोरून नेणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून चोरीची ४८ क्विंटल तूर जप्त करण्यात आली.
इलियास सुलेमान खान (रा. औरंगाबाद) , जब्बार बुढण पठाण (रा. श्रीपत धामणगाव, ता. घनसावंगी, जि.जालना) आणि रवी लक्ष्मण वाहुळे (रा. पिंपली धामणगाव, ता. परतूर, जि. जालना), अशी आरोपींची नावे आहेत. ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, मनीष जगनलाल साहुजी ( रा. सिडको, पवननगर) यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. चितेगाव शिवारात नीलेश गावंडे यांचे गोदाम भाड्याने घेऊन ते धान्य साठवितात. जानेवारी महिन्यात त्यांनी ८० पोती तूर तेथे ठेवली होती. त्यांचे गोदामाचे शटर उचकटून चोरांनी तूर चोरून नेली होती. याविषयी त्यांनी चिकलठाणा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, हवालदार राजेंद्र जोशी, संजय काळे, शेख नदीम, संजय भोसले, बाबासाहेब नवले, गणेश गावडे, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांच्या पथकाने तपास करून संशयित आरोपी इलियास खान याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी आरोपी जब्बार पठाण आणि रवी वाहुळे यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी आरोपी रवीच्या परतूर येथील ओमकार ट्रेडर्स आणि माजलगाव येथील निखिल ट्रेडर्स येथे माल लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणाहून ४८ क्विंटल तूर जप्त केली.
=====
चौकट
अंबड, फुलंब्री परिसरातही चोरी
आरोपींनी फुलंब्री आणि अंबड (जिल्हा जालना ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर उचकटून अशाच प्रकारे माल चोरी केल्याची कबुली दिली. चोरटे गोडाऊनमधील माल वाहून नेण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर करीत होते, असे तपासात निष्पन्न झाले.