औरंगाबाद : घरफोडीच्या गुन्ह्यात न्यायालयाने सशर्त जामीन मिळाल्यानंतर वारंवार समन्स, वॉरंट काढूनही हजर न होता तब्बल २३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली.
संजय विश्वनाथ सरोदे (रा. नारेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात सिडको ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराला जामीन मिळाल्यानंतर तो जर न्यायालय बोलावील तेव्हा त्यांच्यासमोर हजर होत नसेल तर त्याच्या खटल्याचे कामकाज थांबते. साक्षीपुराव्याचे काम होत नाही. परिणामी असा खटला डॉरमंट (स्थूल अवस्थेत) जातो. जोपर्यंत आरोपी सापडत नाही, तोपर्यंत हा खटला न्यायप्रविष्ट राहतो.
अशा खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने फरार आरोपींना शोधून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी एक पथक स्थापन केले आहे. आरोपी संजय सरोदे हा घरफोडीच्या गुन्ह्यात अटक होता. न्यायालयाने त्याला २३ वर्षांपूर्वी जामीन दिला. तेव्हापासून तो पुन्हा न्यायालयाकडे फिरकलाच नव्हता. न्यायालयाने त्याच्याविरोधात तीन वेळा समन्स आणि नंतर अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.
मात्र, तो पोलिसांना सतत चकमा देत होता. त्याने घराचा पत्ता बदलल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक मारोती दासरे, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, फारुख देशमुख, बबन इप्पर, आनंद वाहूळ आणि मुक्तेश्वर लाड यांच्या पथकाने त्याला नारेगाव परिसरात येताच शनिवारी रात्री अटक केली.