खुलताबाद : वेरुळ येथील एका मोटारसायकल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी बाबासाहेब सांडू त्रिभुवन याला न्यायालयात शिक्षा झाल्यानंतर त्यास दुचाकीवरुन हर्सुल कारागृहात सोडताना तो शुक्रवारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्यास शनिवारी पहाटे पाचपीरवाडी रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागील आमराईत पोलीस पथकाने शिताफीने पकडण्यात यश मिळविले. ही कारवाई पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील प्रकाश मोहिते, संजय जगताप, उज्ज्वला जाधव, भाऊसिंग जारवाल, वाल्मिक कांबळे, गणेश लिपणे, सुभाष खुरमुटे, शंकर भोसले यांनी केली. त्यांना पाचपीरवाडी येथील जीवन सुंदरडे, करणसिंग सुलाने, राजू बिमरोट, उदयसिंग कवाळे, मोतीलाल सुलाने, नेहरु जारवाल, लालसिंग सुलाने यांनी मदत केली. खुलताबाद पोलीस ठाण्यात दोन ते तीन चारचाकी वाहने उपलब्ध असताना खुलताबाद पोलिसांनी आरोपीला मोटारसायकलवर बसवून नेलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या अशा वागण्यामुळे जनतेत चांगलेच हसू निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:25 AM