औरंगाबाद- चहाटपरी चालविणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष कारावास आणि विविध कलमांखाली ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी गुरुवारी ठोठावली.
आरोपीचे नाव मदन रामदास चव्हाण (रा. बन्नीतांडा, ता. पैठण) असे आहे. आरोपीला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक बच्चनसिंग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले.
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी मदन चव्हाण याला एक वर्ष कारावास, २० हजार रुपये दंड, अॅट्रॉसिटीचे कलम अन्वये एक वर्ष कारावास, २० हजार रुपये दंड अणि अॅट्रॉसिटीच्या कलम २ (व्ही) (अ) अन्वये सहा महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एस. पी. खरात आणि जे. आर. पठाण यांनी काम पाहिले.