औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार करणाऱ्या एका रॅकेटचा गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. या रॅकेटमधील आरोपीत घाटीतील परिचारिका आणि तिच्या पतीचा समावेश आहे. ही परिचारिका अवघ्या दीड महिन्यापूर्वीच कंत्राटी तत्त्वावर घाटीत रुजू झाली. समिती नेमून चौकशी करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला आहे.
घाटीतून हजारो रुपयांचे रेमडेसिविर इंजेक्शन लंपास झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने सर्वप्रथम १४ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला होता. या वृत्तानंतर रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे एकेक रॅकेट समोर आले. गुन्हे शाखेने बुधवारी पकडलेल्या रॅकेटमधील आरोपीत घाटीतील कंत्राटी नर्स आरती जाधव-ढोले हिचा समावेश आहे. ती घाटीत ३० मार्च रोजी रुजू झाली आहे. मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये ती कार्यरत होती. या प्रकरणात आरोपी असलेला तिचा पती नितीन जाधव याने पत्नी आरतीकडून इंजेक्शन आणल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे आरोपींमध्ये आरती हिचाही समावेश आहे. यामुळे घाटीनेही चौकशी सुरू केली आहे. इंजेक्शनची जबाबदारी ही इंचार्ज सिस्टरवर असते. आरती कार्यरत असलेल्या वाॅर्डातील इंजेक्शनच्या परिस्थितीची माहिती आता घाटीकडून घेतली जात आहे. इंचार्ज सिस्टरने इंजेक्शनचा हिशेब योग्य असल्याचे सांगितल्याचे समजते.
काय प्रकार, हे शोधणार
अधिष्ठाता, मेट्रन, विभागप्रमुख यांची समिती नेमण्यात आली आहे. नेमका काय प्रकार झाला आहे, हे तपासले जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी दिली.