औरंगाबाद : दोनशे रुपये कमिशन देऊन दुसऱ्या बँक खात्यात २० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्यानंतर संबंधितांना फोन पेद्वारे पैसे पाठविण्याचे आमिष देणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. श्रेयस अशोक मालेगावे (२३, रा. तनवाणी शाळेच्यामागे, वडगाव कोल्हाटी) असे आरोपीचे नाव आहे.
सायबर पोलीस ठाण्यात विनय निकम (रा. कैलासनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कस्टमर सर्व्हिस सेंटरमध्ये मालेगावे हा आला. त्याने २०० रुपये कमिशन देऊन त्यांच्याकडून २० हजार रुपये दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले. या व्यवहारासाठी स्वत:च्या फोन पेवरून निकम यांच्या फोन पेचा क्यूआरकोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करीत असल्याचे भासवून त्याने पळ काढला.
आरोपी हा तांत्रिक कौशल्याचा आधार घेत स्वत:च्या मोबाइलचे इंटरनेट बंद करून फोन पेवरून ट्रान्झॅक्शन करण्याचे भासवत होता. तसेच हातचलाखीने सक्सेस झालेल्या जुन्याच ट्रान्झॅक्शनची ऑनलाइन रिसिप्ट दाखवत होता; परंतु आरोपीच्या मोबाइलचे ट्रान्झॅक्शन सक्सेस झाल्याचे दिसत असल्यामुळे मालक व्यवहार पूर्ण झाल्याच्या भ्रमात राहत असे. त्याचवेळी आरोपी इतर साथीदारांच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी होत होता. शहरातील ४ ते ५ ठिकाणी असाच फसवणुकीचा प्रकार केल्याचे उघड झाले होते. या आरोपीला सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिसगाव येथील म्हाडा कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्याने कस्टर सर्व्हिस सेंटरची फसवणूक केली असल्याची कबुलीही यावेळी दिली. ही कारवाई निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, हवालदार धुडकू खरे, सुशांत शेळके, गोकूळ कुतरवाडे, मन्सुर शहा, विजय घुगे, राम काकडे, धनंजय सानप, संदीप पाटील, वैभव वाघचौरे, संगीता दुबे, सोनाली वडनेरे, चालक कांबळे यांच्या पथकाने केली.