सिल्लोड/ शिवना : पन्नास लाखांच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात रविवारी सायंकाळी व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रकार घडला होता. या घटनेत अखिलेश सुधीर गुप्ता आरोपींच्या तावडीतून सुटल्याने त्यांच्यावर गोळीबारसुद्धा करण्यात आला होता. याप्रकरणी अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या या घटनेबाबतची माहिती अशी की, या प्रकरणातील चार आरोपींनी ५० लाखांच्या खंडणीसाठी अखिलेश गुप्ता यांना शिवना भागातील खुपटा गावाच्या शिवारातील त्यांच्या शेताजवळ चारचाकी वाहनातून जात असताना अडविले होते. यादरम्यान आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवीत गाडीतील मजुरांना खाली उतरवले होते. गुप्ता यांना त्यांच्याच गाडीत बसवीत अपहर करण्याचा डाव त्यांनी आखला होता; परंतु गुप्ता आरोपींच्या तावडीतून निसटल्याने आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर गुप्ता यांनी अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा माणिकराव काळे (२२, रा.शिवना), सागर संतोष सोनवणे (२३, रा.आडगाव भोबे), वैभव कालभिले (२३, रा. नाटवी), सचिन चिंधू सोनवणे (२५, रा.जळगाव), या आरोपींना ताब्यात घेतले. यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर, पोहेकॉ आबासाहेब आव्हाड, अक्रम पठाण, नीलेश शिरस्कर, कौतिक चव्हाण, रविकिरण भारती, प्रवीण बोदवडे, प्रदीप बेदरकर आदींनी आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपींकडून कबुलीआरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्टल, त्यासोबत एक जिवंत काडतूस, मोटारसायकल, ३ मोबाईल व एक लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. आरोपीनी हे अपहरण ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी केले असल्याची कबुली दिली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांनी दिली.
अवघ्या ८ तासांत गुन्हा उघडअजिंठा पोलिसांसमोर हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीवरून त्यांनी प्रथम या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेले दोन आरोपी रात्रीच जेरबंद केले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले. अजिंठा पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत हा गुन्हा उघड केला.