हिंगणा शिवारात शेतकरी मिलिंद म्हस्के यांच्या शेतात काही दिवसांपूर्वी विहीर खोदकाम सुरु असताना रंगीबेरंगी गारांसह इतर मौल्यवान गौणखनिज सापडले. ही माहिती मिळताच तहसीलदार प्रवीण पांडे यांनी १२ एप्रिल रोजी घटनास्थळी पंचनामा करुन विहीर खोदकाम करण्यास मनाई केली. मात्र तरीही विहिरीत खोदकाम करुन गौणखनिज काढले जात असल्याची गुप्त माहिती फर्दापूर पोलिसांना मिळाली, त्यांनी १७ एप्रिल रोजी रात्री छापा टाकला. तेव्हा आरोपी आरिफ पठाण, इरफान पठाण, समाधान राऊत, अरुण महाजन, मधुसूदन बामणोदकर,गफूर शेख, गजानन राऊत, विशाल सरोदे हे गौण खनिज काढताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शेतमालक मिलिंद म्हस्के यांचे सांगण्यावरून खोदकाम करीत असल्याचे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीचे गौणखनिज ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोनि. प्रतापसिंह बहुरे यांच्यासह पोउनि. युवराज शिंदे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सरताळे, महिला पोलीस पटेल, प्रकाश कोळी आदींनी केली.
मौल्यवान गौणखनिजाचे उत्खनन करताना आरोपी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:04 AM