औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधित होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रिलान्सिंंग व खाजगी व्यवसाय करणाऱ्या ७० च्या आसपास डॉक्टरांची सेवा मनपा व शासकीय रुग्णालयामध्ये अधिग्रहित करण्यात आली आहे.
कायदेशीर तरतुदीनुसार इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षांनी जी यादी दिली आहे त्या यादीतील प्रथम फ्रिलान्सिंग डॉक्टर्स व त्यानंतर अनुक्रमांकानुसार औरंगाबाद शहरामधील खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. दरमहा १५ दिवसांची शिफ्ट व ७ दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालयासाठी अधिग्रहित केल्या आहेत. डॉक्टर्सना प्रतिमहा १ लाख २५ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले असून, त्यांच्या मानधनाचा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियान व तत्सम योजनांच्या उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा. सदर डॉक्टर्सचे कामकाज व अन्य कार्यप्रणाली बाबींच्या अनुषंगाने मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी अटी, शर्ती निर्गमित कराव्यात, असे आदेशात नमूद आहे.
...तर वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्दखाजगी व्यावसायिक डॉक्टर्सनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तातडीने रुजू व्हावे. ते रुजू झाले नाहीत, तर संबंधितांविरुद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, तसेच संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.