उंडणगाव : शिवारातील एका शेतकऱ्याच्या एका एकरातील सोयाबीन पीक नीलगाईंनी फस्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतावर वन्यप्राण्यांनी धुडगूस घातल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
उंडणगावाला चारही बाजूने डोंगर आहे. या डोंगराळ भागामध्ये जंगली वन्यप्राणांची मोठ्या प्रमाणावर संख्या झालेली आहे. या वन्यप्राण्यांचा बिनधास्तपणे वावर आहे. हे वन्यप्राणी या भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत.
येथील महिला शेतकरी शारदाबाई सावळे यांनी गट नंबर ६०२ मध्ये सोयाबीन लागवड केली आहे. मात्र, हे सोयाबीन पीक नीलगाईंनी शनिवारी रात्रीतून फस्त केले. आधीच दुबार पेरणीचे संकट, त्यात कमी पावसाचे संकट असताना, वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त बनले आहेत. नीलगाईंनी केलेल्या नुकसानीचा वन विभागाकडून पंचनामा करून मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
--
संपूर्ण जंगलास करावे तारेचे कुंपण
उंडणगाव परिसराच्या चारही बाजूला घनदाट डोंगराळ भाग आहे. या डोंगरांमध्ये हरीण, मोर, नीलगाय, रानडुक्कर, बिबट्या, तरस आदी वन्यप्राण्यांचा समावेश असतो. हे वन्यप्राणी डोंगरालगतच्या शेतातील पिके पूर्णपणे खाऊन टाकतात. नासधूस करतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाच्यावतीने डोंगराच्या काठावरच तारेचे कुंपण करण्याची गरज आहे. शासनाने भरीव निधी उपलब्ध करून या डोंगराळ भागाला तार कुंपण करावे, अशी मागणी केली आहे.
----
सोबत फोटो :
एका शेतातील नीलगाईंनी फस्त केलेले सोयाबीन पीक.