औरंगाबाद : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन संचारबंदी आणि ब्रेक द चेनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुध्द पोलिसांकडून थेट कारवाई केली जात आहे. १ एप्रिल ते ११ मे या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठाण्यांत ३७७ गुन्हे नोंदविण्यात आले. विनामास्क फिरणाऱ्या ४ हजार ४३६ नागरिकांवर आणि विनापरवानगी रस्त्यावर वाहने आणणाऱ्या १० हजार ६४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर विनापरवानगी जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई आहे. असे असताना औरंगाबाद शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. विविध रस्त्यांवर आणि चौकांत पोलीस नाकाबंदी करीत आहेत. १ एप्रिल ते ११ मे या कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या ४ हजार ४३६ नागरिकांकडून पोलिसांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ४ लाख १२ हजार ७५० रुपये दंड वसूल केला, तर वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या १० हजार ६४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ या कालावधीत दुकाने उघडण्याची परवानगी आहे. असे असताना विनापरवानगी आणि निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने सुरू ठेवणाऱ्या २३४ दुकानांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
===============
चौकट
१०,६४० वाहनचालकांवर कारवाई
विनापरवानगी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई आहे. असे असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार ६४३ वाहनचालकांविरुध्द मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २३ लाख ६७ हजार ३५० रुपये दंड ठोठावण्यात आला.