छत्रपती संभाजीनगर : वक्फ बोर्डाच्या राज्यात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आहेत. त्यातील अनेक जमिनींचे भूमाफियांनी श्रीखंड खाण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी लीगल सेल स्थापन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्यासह सदस्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची तीन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी पार पडली. बोर्डाला सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सोलापूरच्या चिरागली कब्रस्तान, पुण्याच्या आलमगीर मशीदबाबत अनेक तक्रारी होत्या. यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील जागांबाबतही चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या पॅनलवर वकील नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय बैठकीत तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन दिवस विविध प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. पहिल्या दिवशी ४२, दुसऱ्या दिवशी ९६ असे एकूण १३८ प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आले. ७० तक्रारींमध्ये क्लोज फॉर ऑर्डर करण्यात आली. तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष डॉ. मिर्झा यांनी दिले. बैठकीस खा. फौजियाखान, खा. इम्तियाज जलील, आ. फारूक शहा, मौलाना अथर अली, हसनैन शाकीर, मुदसीर लांबे, समीर काजी, उपमुख्य कार्यकरी अधिकारी जुनेद सय्यद यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत भाग घेतला.
ऑडीटसाठी नोटिसा जोरीराज्यातील तब्बल तेरा हजार संस्थांना आपले ऑडिट दाखल करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रलंबित वक्फ फंड उत्पन्नास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वक्फ जामिनींना भाडेतत्त्वावर (लीज) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रयोगास प्रतिसाद मिळत असून, महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे.