औरंगाबाद : जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या सर्व चेकपोस्टवर विनामास्क येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना केली आहे. विदर्भ, मुंबई आणि पुण्यातून, मराठवाड्यातून औरंगाबादेत रोज खासगी वाहनांतून व इतर वाहनांनी येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून जिल्हा सीमांवर पुन्हा कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. मुंबई, पुण्याहून अमरावती, अकोल्यासह विदर्भात जाण्यासाठी व येण्यासाठी या जिल्ह्यातील नागरिकांना औरंगाबादहून मार्ग आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे चेकपोस्टवरील तपासण्या करण्यासाठी प्रशासन परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्याच्या सीमेतून ये-जा करणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी चेकपोस्ट लावण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेईल. चेकपोस्टच्या तपासणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांत रुग्ण वाढत असून सर्व जिल्ह्यातील सीमांवर वेगाने तपासणीची मोहीम राबविण्याची तयारी प्रशासनाने ठेवलेली आहे.
चौकट..
पोलीस आयुक्तांनी मागितली परवानगी
शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि गर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे विशेष अधिकारांच्या अनुषंगाने मंगळवारी एक पत्र दिले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर ११ एप्रिलपासून कडक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.