गेवराई : मनरेगा अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या विहिरी, सार्वजनिक विहीर, रस्ते या कामाच्या प्रस्तावावर ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या बनावट व खोट्या स्वाक्षरी करून अनेकजण पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल करीत आहेत. अशा पद्धतीने प्रस्ताव दाखल केल्यास संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सभापती अजस्मिता पंडित यांनी दिला आहे. यामुळे बोगसगिरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.मनरेगा योजने अंतर्गत असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक विहीर आणि रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करायचे असतात. या प्रस्तावावर ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सह्या व शिक्का असतो. परंतु काहीजणांनी मनरेगा अंतर्गत दाखल केलेल्या प्रस्तावावर यावरील अधिकारी व पदाधिकारी यांचे बनावट शिक्के मारून व खोट्या सह्या करून ते प्रस्ताव पं.स.कडे दाखल केले असल्याची माहिती माजी उपसभापती अभयसिंह पंडित यांना मिळाल्याने त्यांनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित तसेच सभापती व संबंधित अधिकाऱ्यांकडे या बाबत माहिती देऊन चर्चा केली. यानुसार सभापती अजस्मिता पंडित व गटविकास अधिकारी राजगुरू यांनी आलेल्या प्रस्तावाची छाननी केली असता त्यात ३१ प्रस्ताव बनावट व खोट्या स्वाक्षरीने दाखल केल्याचे निदर्शनास आले. ते सर्व प्रस्ताव पुनर्सर्व्हेसाठी परत पाठविण्यात आले आहेत. या पुढे असे प्रस्ताव आढळून आल्यास संबंधितावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा पोलिसात दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा सभापती पंडित यांनी दिला आहे. यावेळी गटविकास अधिकारी राजगुरू उपस्थित होते. या इशाऱ्यामुळे बोगसगिरी करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
बोगस प्रस्ताव करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: April 18, 2017 11:36 PM