औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेंतर्गत महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजलाईन टाकल्या आहेत. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोटारी लावून पाण्याची चोरी सुरू केली होती. यासंदर्भात खंडपीठाने त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश मनपाला दिले होते. बुधवारी सकाळी चिकलठाणा भागात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. संतप्त शेतकऱ्यांनी मनपाच्या जेसीबीवर जोरदार दगडफेक केली. या घटनेत जेसीबीचालक, एक छायाचित्रकार जखमी झाला.
भूमिगत गटार योजनेंतर्गत महापालिकेने तीन ठिकाणी मल जलप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी प्लांट) उभारले आहेत. त्यासाठी मोठमोठ्या ड्रेनेजलाईन टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमधून अनेक जण पाणी चोरून घेत आहेत. या पाण्यावर भाजीपाला पिकवीत आहेत. हा विषारी भाजीपाला शहरात विक्रीसाठी येत आहे. पाणी चोरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यात महापालिकेने कारवाई करून अनेकांच्या मोटारी जप्त केल्या होत्या. दरम्यान, या याचिकेवर गुरुवारी खंडपीठात सुनावणी होणार असल्याने बुधवारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी चिकलठाणा भागातील चौधरी कॉलनी परिसरात गेले होते.
पथकाला ड्रेनेजलाईनवर मोटारी आढळून आल्या नाहीत. मात्र, शेतीपर्यंत पाईप टाकण्यात आल्याचे समोर आले. हे पाईप जप्त करण्याची कारवाई सुरू होती. याचवेळी दुपारी दीड वाजता सुमारे शंभर ते दीडशे जणांचा जमाव या ठिकाणी जमला. त्यांनी कारवाई करण्यास विरोध केला. वॉर्ड अभियंता एस. एम. जाधव यांनी न्यायालयाचे आदेश आहेत. आम्हाला अंमलबजावणी करू द्या, अशी विनंती केली. मात्र, संतप्त जमावाने जोरदार दगडफेक केली. त्यात जेसीबीच्या काचा फुटल्या व चालक गणेश दराडे जखमी झाले. त्यानंतर जमावाने कारवाईचे छायाचित्रण करणारे गणेश सोनवणे यांच्याकडे मोर्चा वळविला. सोनवणे यांच्या कॅमेऱ्याची बॅग हिसकावून घेतली. त्यात कॅमेऱ्याचे नुकसान झाले. या प्रकरणी चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाधव व सोनवणे यांनी तक्रार दिली आहे.
ट्रॅक्टरभर पाईप जप्त कारवाईसाठी चिकलठाणा एमआयडीसी पोलिसांनी १५ जणांचा बंदोबस्त दिला होता. दगडफेकीनंतर कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी पोलिसांना अधिक कुमक पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या कारवाईत एक ट्रॅक्टरभर पाईप जप्त करण्यात आले.