जालना : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी भोकरदन येथील खताच्या काही दुकानांवर छापे मारल्याने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. जादा दराने खत विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्यात आला असून पथक आल्याचे कळताच काही विक्रेत्यांनी दुकाने बंद करून तेथून पळ काढला. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, शनिवारी रेल्वेस्थानकावर आरपीएस युरियाचा २६०० मेट्रिक टन माल उपलब्ध झाला. हा माल तालुकानिहाय नियोजन करून वाटप करण्यात आला. ज्या दुकानांवर हा माल नेण्यात येणार आहे, तेथे अगोदरच कृषी सहाय्यकांना बसविण्यात आले होते. भोकरदन येथे जादा दराने खत विक्री करणाऱ्या सतीश अॅग्रो एजन्सीवर कारवाई करण्यात आली असून अन्य एका दुकानात माल आलेला असताना त्यांनी शेतकऱ्यास माल नाही म्हणून सांगितल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. भोकरदन येथे ज्या विक्रेत्यांकडे आरपीएस युरियाचा माल आला, त्यांना तात्पुरते विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसमक्ष शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात येणार आहे. खत वाटपासंबंधी काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहन गंजेवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात युरिया खत आल्याने शेतकऱ्यांनी शनिवारी विविध खताच्या दुकानांसमोर अशा रांगा लावल्या होत्या. भोकरदन तालुक्यात खत विक्रीस बंदीचे तात्पुरते आदेश देण्यात आले असून सोमवारी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमक्ष शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: September 13, 2014 11:22 PM