ब्ाीड : तालुक्यातील नवगण राजुरी येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सहायक अधीक्षक डॉ. एन. हरी बालाजी यांच्या पथकाने जुगारअड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करतेवेळी गजानन कारखान्याचे चेअरमन रवींद्र क्षीरसागर यांनी अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.अमोल महादेव बहीर, गणेश बेलेश्वर दहीवाले, सचिन पंजाब पवार, ज्ञानेश्वर दिलीप गवळी, संतोष सर्जेराव गावडे, योगेश त्रिंबक मिंधे, जालिंदर गणपत शिंदे (सर्व रा.राजुरी) या सर्वांना अटक करण्यात आली.हे सर्व रवींद्र क्षीरसागर यांच्या मळ्यापासून एक किमी अंतरावर तिर्रट खेळत होते. त्यांना अटक करून जीपमध्ये बसविताना रवींद्र क्षीरसागर तेथे पोहचले. त्यांनी शिवीगाळ करून धमकावल्याची फिर्याद पोहेकाँ सतीश नरवणे यांनी नोंदवली. यापैकी बहीर याने काठीने मारहाण केली, तर मिंधे याने नरवणे यांच्या कमेरची पिस्तूल ओढण्याचा प्रयत्न केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींकडून जुगार साहित्य व रोख रक्कम असा ६२०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण ठाण्यात अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक गणेश गावडे तळ ठोकून होते. या कारवाईनंतर काकू -नाना आघाडीचे प्रमुख संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी ग्रामीण ठाण्यात धाव घेतली. बीड पालिकेतील सभेच्या पूर्वसंध्येला झालेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते. (प्रतिनिधी)
राजुरीतील जुगार अड्ड्यावर कारवाई
By admin | Published: January 17, 2017 12:10 AM