वाळूज महानगर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने वाळूज महानगरातील रांजणगाव व सावंगी येथे अवैध प्लास्टिक विक्री करणाऱ्या १० विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत दोन दिवसात ५० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असून जवळपास अडीचेश किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पर्यावरणासाठी प्लास्टिक घातक ठरत असल्याने शासनाने प्लास्टिकच्या उत्पादनावर व वापरावर बंदी घातली आहे. शासनाची बंदी असतानाही अनेक होलसेल व किरकोळ दुकानदार व भाजीपाला-फळ विक्रेते सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर करित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून वाळूज महानगरात अवैध प्लास्टिक विक्री करणाºया विरुद्ध मोहिम राबविली जात आहे.
या मोहिमे अंतर्गत बुधवारी (दि.२६) प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने रांजणगाव येथे कारवाई करत स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून प्लास्टिक विक्री करणाºया दुकानावर छापे मारले. यात ए.एस. जैस्वाल यांचे देशी दारुचे दुकान व साजू खान यांचे पायल साडी सेंटर या दोन दुकानावर छापा मारुन झडती घेतली असता शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्याची विक्री केली जात असल्याचे पथकाला आढळून आले.
तसेच गुरुवारी (दि.२७) सावंगी येथे केलेल्या कारवाईत विशाल प्लास्टिक, पोल इंटरप्रायजेस, नम्रता प्रोव्हिजन, रवि डिस्ट्युबिटर व अन्य चार अशा एकूण ८ दुकानावर प्लास्टिक विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. लगेच पथकातील अधिकाºयांनी संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करुन मुद्देमला जप्त केला.