औरंगाबाद : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने राबविलेल्या धडक मोहिमेत मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची ११७ प्रकरणे शहरात उघडकीस आली आहेत. या सर्वांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यात वीजचोरीविरोधात महावितरणने जोरदार मोहीम उघडली आहे. यात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील भागात विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी प्रत्येक वाहिनीवर दोन ते तीन पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच याकामी भरारी पथकांचेही साह्य घेतले जात आहे. शून्य, १ ते ३०, ३१ ते ५० तसेच ५१ ते १०० युनिट वीजवापर असलेल्या वीजग्राहकांची पडताळणी केली जात आहे. तसेच वीजचोरीची गुप्त माहिती व तक्रारींवरही कारवाई केली जात आहे. यात संशयास्पद मीटर जप्त करून महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे.
औरंगाबाद शहरात राहुलनगर, रोशनगेट, गणेश कॉलनी, जकात नाका, जसवंतपुरा, मोंढा व निजामुद्दिन या विद्युत वाहिन्यांवर १ सप्टेंबरपासून राबविलेल्या मोहिमेत वीजचोरीचा संशय असलेले १४९ मीटर जप्त करण्यात आले. तपासणीअंती यातील ११७ मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार करून जवळपास एक लाख युनिटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. या ग्राहकांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
बिल भरेपर्यंत वीज खंडित..ही बिले त्यांनी २४ तासांत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच वीजचोरीचे बिल भरेपर्यंत त्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.