छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाला अवघे १३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाजारपेठेत विविध साहित्य विक्रीसाठी दुकाने थाटण्यात आली आहेत. गुलमंडी, पैठण गेट आदी मुख्य रस्त्यांवर पथविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने कारवाईचा बडगा उगारला. हातगाड्यांसह कपडे जप्त करण्यास सुरूवात केली. या कारवाईला विक्रेते आणि काही राजकीय कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविण्यात आला.
महापालिकेने मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज आदी भागात नागरी मित्र पथकातील २० कर्मचाऱ्यांनी नेमणूक केली. शुक्रवारी सकाळी पैठण गेटला हातगाड्यांनी पुन्हा विळखा टाकला. नागरी मित्र पथकाने कारवाई सुरू करताच विरोध झाला. सुमारे २५ ते ३० पथविक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसले. यावेळी बरीच वादावादी झाली. पथकाने हातगाड्यांसह कपडे जप्तीची कारवाई केली. त्यानंतर गुलमंडीवर व्यापाऱ्यांनी साहित्य बाहेर ठेवले म्हणून पथकाने कारवाई सुरू करताच काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. पथकाने व्यापाऱ्यांना समजावून सांगत साहित्य दुकानातच ठेवण्याची सूचना केली. त्यानंतर पथकाने रस्त्यावर गस्त सुरू केली.
व्यापारी तक्रार करतात, परंतु कारवाई नाहीदरवर्षी दिवाळीत पैठण गेट ते सिटी चौक आणि शहागंज ते सिटी चौकपर्यंत खरेदीसाठी नागरिकांची अलोट गर्दी होते. दुचाकी वाहनही या ठिकाणाहून नेता येत नाही. वाहतूक पोलिसांना दिवाळीच्या अगोदर किमान आठ दिवस रस्ता बंद ठेवावा लागतो. त्यातच पथविक्रेते मोठ्या प्रमाणात दुकाने लावतात. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या पथविक्रेत्यांचा त्रास होतो. पथविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी दरवर्षी या भागातील व्यापारी मनपा व पोलिसांकडे करतात. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही.