लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात वाढलेल्या फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांच्या पथकाने धडक तपासणी मोहीम राबविली जात आहे़ गुरूवारच्या मोहिमेत वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांची तपासणी करून ४४७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ९५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला़नांदेड विभागातील विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे़ दमरेच्या नांदेड विभागातील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अंजी नायक यांच्यासह वाणिज्य विभागातील अधिकाºयांचा पथकाने गुरूवारी तपासणी मोहीम राबविली़ पहाटे पाच वाजेपासून सुरू झालेल्या तपासणीत नांदेड ते आदिलाबाद, परभणी ते परळी, मुदखेड ते आदिलाबाद, पूर्णा ते अकोला या मार्गावर धावणाºया विविध रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाड टाकण्यात आली़ अचानक झालेल्या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाºयांचे धाबे दणाणले आहेत़ विनातिकिट प्रवास करणाºया प्रवाशांबरोबरच अनियमित प्रवास करणे, परवानगी शिवाय जास्त सामान घेऊन जाणे, धुम्रपान करणे आदी प्रकारच्या प्रवाशांवर कार्यवाही करण्यात आली. यातील काही प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तर विना तिकीट प्रवाशांकडून एका दिवसातच १ लाख ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्या.तपासणी पथकामध्ये रेल्वे सुरक्षा अधिकारी, ३० तिकीट तपासनीस, ६ वाणिज्य निरीक्षक, रेल्वे पोलीस फोर्सचे ८ जवानांचा समावेश होता़ मोहिमेत १२ एक्स्प्रेस आणि ८ सवारी गाड्यांची तपासणी करून ४४७ तसेच विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाºया ९ जणांवर कारवाई करण्यात आली़ यात सीजन तिकीट घेऊन आरक्षित डब्यात प्रवास करणाºयांचा समावेश आहे़
विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:13 AM