लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत अवैध दारू विक्री रोखण्यासह जुगार अड्ड्यावर छापे टाकण्यात येत आहे. संघटितपणे गुन्हे करणाºया शहरातील पाच मटकाबहाद्दरांसह त्यांच्या ६५ साथीदारांवर तडीपारीची कारवाई होणार आहे.पोलीस दलाने मागील काही दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. तसेच टोळी तयार करून जबरी चोरी, लुटमार, घरफोडी यासारखे गुन्हे करणाºया संशयित आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचे रेकॉर्डही तपासण्यात येत आहे. संघटितपणे गुन्हे करणाºयांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. शहरात मटका अड्डे चालविणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. मटका चालविणाºयांवर पोलिसांनी या पूर्वी अनेकदा कारवाई केली आहे.मात्र, कारवाईनंतरही संशयित पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे शहरात संघटितपणे मटका चालविणाºया व मटकाकिंग म्हणून ओळख असणाºया पाच मुख्य संशयितांसह त्यांच्या ६५ साथीदारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पोलीस अधीक्षकांकडे दाखल केला आहे. अशा प्रकारे ७० जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे गौर यांनी सांगितले. यातील दोन जणांवर या पूर्वी शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ७५ गुन्हे दाखल आहेत. त्याबरोबर गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत आहेत. डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने पारंपरिक गणेशमंडळांना मिरवणुकीत ढोल पथकाचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक गाव एक गणपतीसाठी प्रत्येक गावाने प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मटकाबहाद्दरांवर होणार तडीपारीची कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:50 AM