औरंगाबाद : जिल्ह्यातील १३६८ गावांपैकी आतापर्यंत ९२९ गावांत कोरोना पोहचला आहे. ३० मार्चपर्यंत त्या बाधित ९२९ गावांपैकी ४०२ गावांत साडेचार हजार सक्रिय रुग्ण होते. तर २८ दिवसांपासून ३०३ गावांत रुग्ण आढळून आले नाहीत. १४ दिवसांपासून ४८ गावांत तर ७ दिवसांपासून १७६ गावांत कोरोनाबाधित आढळून न आल्याने त्यांचा प्रवास कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी दिली.
बाधित गावांपैकी २५ गावांत १०० पेक्षा अधिक, ५० पेक्षा अधिक रुग्ण असलेली गावे ५३, १ ते १० रुग्ण असलेली ६३६ तर ११ ते ५० रुग्ण असलेली गावे २४० आहेत. बाधित गावांत लसीकरण वाढविणे, अति व कमी जोखिमेच्या लोकांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे तसेच बाधित नसलेली गावे कोरोनामुक्त ठेवण्यावर सध्या यंत्रणेचे लक्ष केंद्रित आहे. कोविड केअर सेंटरची सध्याची क्षमता पुरेशी असून, पुढील गरजेप्रमाणे कोविड केअर सेंटर सज्ज केले जात आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले. रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पैठण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.
--
लसीकरणासाठी गावागावात फलक, दवंडी
लसीकरणासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच लसीकरणाच्या वेळेसंबंधी जागोजागी फलक लेखन, दवंडी, समाजमाध्यमांवर माहिती ग्रामपंचायतींच्या माध्यमातून दिली जात आहे. सिल्लोड, फुलंब्री तालुक्यातील ग्रामपंचायतींसह आरोग्य केंद्रांच्या माध्यमातूनही माहिती लोकांपर्यंत पोहचून कोरोना तपासणीसाठी आवाहन केले जात आहे. तसेच आठवडीबाजार न भरवण्यासंबंधीच्या सूचनाही दिल्या जात असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले.
---
तालुका : सक्रिय गावे : रुग्ण संख्या
औरंगाबाद : ५७ : १२५०
फुलंब्री : ३३ : २२३
गंगापूर : ५६ : ७६९
कन्नड : ५६ : ६९३
खुलताबाद : १८ : १४१
पैठण : ४३ : ६३०
सिल्लोड : ४५ : ३४२
सोयगांव : १८ : ६३०
वैजापूर : ६७ : ९६७