औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थेट स्थानबद्धच केले. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकरवी दडपशाही केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. दिवसभरात ११ कार्यकर्ते स्थानबद्ध करण्यात आले.
महाजनादेश यात्रेदरम्यान शहरात होणाऱ्या सभेत मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा देण्यासह मानवी साखळी, शेतकऱ्यांचे आंदोलन, तसेच मेंढरे सोडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी दडपशाहीचा प्रकार केला. गुन्हे शाखेच्या चार अधिकारी व २० कर्मचाऱ्यांमार्फत आंदोलनकर्त्यांना पहाटेपासून ताब्यात घेण्यात आले. बीडमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या पूजा मोरे यांचे औरंगाबादमधील काका राजाराम मोरे यांच्या घराला सोमवारपासून बीड तसेच स्थानिक पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. पूजा मोरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाचे अनुदान जाहीर करावे, अन्यथा मराठवाड्यात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. तसे पत्र सोशल मीडियावर टाकले होते. पूजा मोरे या औरंगाबादेत त्यांचे काका राजाराम मोरे यांच्याकडे आल्याचा संशय घेत पोलिसांनी पुंडलिकनगरमधील मोरे यांना सोमवारी रात्रीपासूनच नजरकैदेत ठेवले.
धनगर समाज आरक्षणाच्या आंदोलनावरून धनगर समाज संघर्ष समितीने महाजनादेश यात्रेत मेंढरे सोडण्याचा इशारा दिला होता. धनगर समाज संघर्ष समितीचे कार्यकर्ते रंगनाथ राठोड, माजी सभापती अरुण रोडगे, रासप दिलीप रिठे, धनगर समाज संघर्ष समितीचे शहराध्यक्ष कैलास रिठे, शिवाजी वैद्य यांना ताब्यात घेतले आहे. अन्नदाता शेकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी, अन्वर अली तसेच अजम खान, अब्दुल रऊफ अ. मजीद तसेच शेतकरी संघटनेचे कृष्णा साबळे, मुक्ताराम गव्हाणे आदींना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकशाहीत ही दडपशाही कशामुळेराष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम मोरे हे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात असे आंदोलन दडपण्याचा प्रकार कधीच झाला नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा काय गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी केला.
गाडीत बसवून शहराभोवती नगर प्रदक्षिणाअटक केलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये पहाटेपासून बसवून त्यांना शहराबाहेर फिरविण्यात आले. आंदोलनाचे पत्र दिल्याने आम्हाला उचलण्यात आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटकमहाजनादेश यात्रेसमोर निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सिटीचौक पोलिसांनी अटक केली. महासचिव अमीर अब्दुल सलीम, शहराध्यक्ष मुजफ्फर खान पठाण, शहर महासचिव शफीक सरकार शाहेद शेख अशी अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
कारवाई करणारसामाजिकदृष्ट्या उपद्रव निर्माण करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येते. १५१ (१) प्रमाणे अटक करून संबंधित पोलीस ठाण्यातून २४ तासांनंतर बाँडवर हमी दिल्यानंतर सोडून देण्यात येणार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात देण्यात आले असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
सेव्ह मेरिटचे आंदोलन रद्दसिल्लेखाना येथे मानवी साखळी करून मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणी मांडण्याच्या तयारीत असणाऱ्या विजया अवस्थी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. प्रवीण काबरा, अनिल मुळे, अण्णा वैद्य, देवेंद्र जैन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आंदोलकांना सायंकाळी विमानतळावर मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्याचे आश्वासन देण्यात आले. विमानतळाचे पासेसदेखील तयार केले. नंतर मुख्यमंत्र्यांना फक्त निवेदन देता येईल, असे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत आम्हाला चर्चा करायची आहे, असे सांगून निवेदन देण्यास ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’च्या आंदोलकांनी नकार दिला.