विशाल सोनटक्के उस्मानाबादभाई उद्धवराव पाटील यांच्या वेळचा काळ हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा होता. ताकद, पैसा, यंत्रणा या ऐवजी निष्ठेच्या बळावर निवडणुकीची तिकीटे दिली जात होती. राजकारणातील हा निष्ठेचा धडा उस्मानाबाद जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्राला दिला. त्याच जिल्ह्यातील राजकारणात आज लक्ष्मी दर्शनाला महत्व आले आहे. पर्यायाने कार्यकर्ते हद्दपार होत असल्याची विदारक स्थिती पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकर्षाने दिसत आहे.आजच्या निवडणुकीचे वातावरण पाहिले असता, उध्दवरावांच्या काळात उस्मानाबादकरांनी पाहिलेल्या राजकारणाचा सारिपाट डोळ्यासमोर उभा राहतो. तो काळ शेकाप, जनता दल, जनता पक्ष यांचा होता. आणि या पक्षांपेक्षाही खऱ्या अर्थाने पक्षातील कार्यकर्त्यांचा, त्यावेळी पैसा हे माध्यम नव्हते तर प्रतिष्ठा आणि पक्षाच्या विचाराप्रती असलेल्या निष्ठेला महत्व होते. कार्यकर्त्याला संधी देणारा हा काळ आता इतिहास होवू पहात आहे.१९६० साली उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून भाई उद्धवराव पाटील यांनी निवडणूक लढवावी म्हणून कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आग्रह होता. या आग्रहाला मान देत उद्धवराव पाटील निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी उस्मानाबाद परिसरातील २५ ते ३० गावातील नागरिकांनी निवडणूक निधी गोळा केला. विशेष म्हणजे निवडणुकीसाठी लोकवर्गणी जमा करणाऱ्यांमध्ये शेतमजुरांची संख्या सर्वाधिक होती. या लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातूनच उद्धवराव पाटील यांच्या उमेदवारी अर्जासह डिपॉझीटही भरण्यात आले. आपल्याच मातीतील ही घटना आज सांंगूनही खरी वाटणार नाही. अशी परिस्थितीच राजकारणात निर्माण झाली आहे. त्यावेळी केवळ विकास आणि विरोधकांचा भ्रष्टाचार हे दोनच प्रचाराचे मुद्दे असायचे, सभाही मोजक्याच व्हायच्या. भाषणामध्ये टिका असायची परंतु ठोस पुराव्यासह. आज निवडणुकीचा प्रचार आणि प्रचाराची साधने बदलली असून, राजकारणाचे तंत्रही बदलले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्ता ही संकल्पनाच बाद होत असल्याचे चित्र आहे. किंबहुना सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविणेच अशक्य होवून बसले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सर्वच पक्षात सुरु आहे. या प्रक्रियेत आता सर्वाधिक महत्व आहे ते निवडून येण्याच्या क्षमतेला. त्यापाठोपाठ दुसरा प्रश्न असतो तो निवडणुकीत खर्च किती करणार? या दोन्ही प्रश्नावरच वर्षानुवर्ष एकनिष्ठपणे पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची विकेट पडत आहे.
कार्यकर्ते होताहेत निवडणूक रिंगणातून हद्दपार..!
By admin | Published: January 29, 2017 11:43 PM