शिरीष शिंदे / व्यंकटेश वैष्णव , बीडपांढरं कपाळ घेवून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सिने अभिनेता नाना पाटेकरसह सिनेसृष्टी धावून आली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जीवावर खुर्ची मिळवणारे नेते मात्र आत्महत्येचे राजकारण करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच दंग आहेत. चंदेरी दुनियेत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेते रविवारी बीडमध्ये सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेत दिसले.नानांच्या जोडीला बीडचा भूमिपूत्र सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे, लेखक अरविंद जगताप, नितीन नेरूळकर, अमोल अंकुटे हे देखील होते. या सर्वांनी ११२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपये एवढी आर्थिक मदत तर दिलीच शिवाय मानसिक आधारही दिला. यावेळी त्यांनी ना गाजावाजा केला ना फोटोसेशन केले. माध्यमांपासून चार हात दूर राहत त्यांनी शेतकरी कुटुंबियासमवेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीने शेवटचे टोक गाठले आहे. अशा परिस्थितीतही स्वत: सत्ताधारीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे सामाजिक उत्तरदायित्वावच्या भावनेतून नानांन सारखी माणसं बळीराजाच्या मदतीला धावून येतात. तसे पाहिले तर जिल्ह्यातील नागरिकांचे आणि नानांचे यापूर्वी कसलेच ऋणानुबंध नाहीत. नानांना भविष्यात बीडच्या जनतेकडे मते मागायला यायचे नाही. नि:स्वार्थपणे नानांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. निराश चेहऱ्यांसह बसलेल्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना हे नविनच होते. ‘क्रांतीवीर’ चित्रपट गाजविणाऱ्या नानाने ‘क्रांतीदिनी’च मदतीचा हात दिला.देव करो आणि आमच्यासारखी वेळ कोणावरही न येवो. घरातला कर्ता निघून गेल्यावर कुटुंबाच्या हालअपेष्टा काय असतात, हे आम्ही सध्या भोगतो आहोत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आम्हाला मदत दिली. पण आम्हाला जगण्यासाठी समाजातून हिम्मत द्या, आमच्या हाताला काम द्या तेंव्हाच आम्ही आमच्या पोराबाळांचा सांभाळ करू शकू...असे भावोद्गार ज्योती मोराळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने काढले. या व्यथा मांडतानाच ज्योती मोराळे या मंचावरच कोसळल्या. त्यानंतर स्वत: नाना पाटेकर व इतर सर्वजण धावत जावून त्यांना धीर दिला.रोज दैनिकात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या वाचून त्रास होतो. सरकार पोहोचेल तेव्हा पोहोचेल. आपलेही काही कर्तव्य आहे, या भावनेतून हे काम मी केले आहे. पांढरी फटफटीत कपाळं पहायला खूप त्रास होतो. हे प्रत्येकजण करत असतो. ज्याच्या-त्याच्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे.भाषणे संपल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंूबियांना बंद पाकीटातील १५ हजार रुपयांची रक्कम व्यासपीठावर बोलावून देण्याऐवजी नाना व्यासपीठाच्या पायऱ्यावर बसला. मकरंद याने नावे पुकारली व नानाने बसून पाकीटे वाटली. यातून नानाचा साधेपणा समोर आला.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला सेलिब्रेटी धावून आले. त्यांच्याशिवाय बीड येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी १ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम देवून दिलासा दिला.
अभिनेते धावले, नेते नाही पावले !
By admin | Published: August 10, 2015 12:42 AM