छत्रपती संभाजीनगर : अभिनेत्री स्व. मीनाकुमारी ‘पाकिजा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी शहरात आल्या होत्या. तेव्हा त्या पर्यटनाच्या राजधानीच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळस त्यांनी आठवण म्हणून माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा शहरवासीयांना भेट दिला होता. लोकार्पण सोहळ्यास स्वत: तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आले होते. या घटनेस आता ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पं.नेहरूंचा हा पुतळा आजही छावणीत दिमाखाने उभा आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूंचा शनिवारी (दि.२७ मे) स्मृतिदिन. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजींचा एकमेव शहरातील एकमेव पूर्णाकृती पुतळा छावणीत आहे. असाच पुतळा हैदराबाद शहरातही आहे. ‘पाकिजा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मीनाकुमारी शहरात आल्या होत्या. तेव्हा शहराच्या काही भागांत व खुलताबाद परिसरात शूटिंग झाली होती. येथील ऐतिहासिक स्थळे पाहून त्या भारावून गेल्या होत्या. या शहराच्या भेटीची आठवण म्हणून त्यांनी पं.नेहरूंचा पुतळा शहरवासीयांना भेट दिला. तेव्हाच्या सार्वजनिक कल्याण समितीतर्फे छावणीत पुतळा उभारण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे या पुतळ्याचे अनावरण २५ मार्च १९६६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची उपस्थिती होती. तेव्हा हा सोहळा पाहण्यासाठी छावणीत सुमारे ७५ हजार लोक जमले होते. गर्दी आटोक्यात येण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता, अशी माहिती त्या क्षणाचे साक्षीदार डाॅ. अनिल मुंगीकर यांनी दिली.
भारताचे शांतिदूतडोक्यावर गांधी टोपी, अंगात कुर्ता, पायजमा, कुर्त्याला ७ बटन. त्यातील वरच्या बटनावर खोचलेला गुलाब, उजवा पाय पुढे, तर डावा पाय पाठीमागे, उजव्या हाताने शांतीचे प्रतीक कबुतर हवेत सोडताना, असा पं.नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. कोनशिलेवर ‘भारताचे शांतिदूत’ असा उल्लेख पं.नेहरूंचा करण्यात आला आहे.