छत्रपती संभाजीनगर : पूर्वीच्या काळी पान-सुपारी खाणाऱ्यांकडे असलेले अडकित्ते त्यांची ‘शान’ असत. कारागिरही त्यावेळी विविध कल्पना व कल्पकता वापरून नक्षीदार अडकित्ते बनवत. मात्र, आताच्या नवपिढीला ‘अडकित्ते’ हा प्रकारच माहीत नाही. कारण कालौघात अडकित्तेही लुप्त होत आहेत. मात्र, तुम्हाला पालखीच्या आकाराचा अडकित्ता, मोर, घोड्यावर स्वार सैनिकाच्या रुपातील अडकित्ता, एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी कट्यार म्हणून वापरता येईल, असे एकाच वेळेस २१० प्रकारचे अडकित्ते बघण्यास मिळाले तर... हा एक आश्चर्याचा धक्काच ठरेल.
अडकित्ता म्हटलं की, धोतर - पटकेवाल्या माणसांची आठवण येते. शाही बैठकीमध्ये तक्क्याला टेकून गप्पागोष्टी करत ते अडकित्त्याने सुपारी कातरत. मात्र, आता पान खाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे अडकित्ते दुर्मीळ झाले आहेत. पण, शहरातील दर्दी रसिक प्रा. अनिल मुंगीकर यांनी या अडकित्त्यांचा संग्रहच करून ठेवला आहे. नवपिढीला यातून भारतीय वैभवशाली कलाकुसर दाखविण्याचा प्रयत्न आहे.
नाविन्यपूर्ण अडकित्तेघुंगरू लावलेले अडकित्ते, मोर, पोपट, चिमणी, कुत्रा, घोडा, गेंडा या आकारातील अडकित्ते, तसेच स्त्री-पुरुषाच्या आकाराचे अडकित्ते, तलवार घेऊन अश्वारूढ झालेल्या सैनिकाचा अडकित्ता, शेषनागावर विराजमान भगवान विष्णूच्या आकारातील अडकित्ते आहेत; शिवाय पालखीलाही अडकित्ता पाहून कारागिराची कल्पकता व कलाकुसर लक्षात येते.
चांदीचा अडकित्तालोखंड, पितळ, तांबे, जर्मन, स्टीलचे अडकित्ते आहेतच; शिवाय चांदीचा अडकित्ताही नाविन्यपूर्ण ठरत आहे. २ चांदीचे अडकित्तेही लक्ष वेधून घेणारे आहेत. वेलबुटी नक्षी कोरलेले, बारीक घुंगरू लावलेले अडकित्तेही तेवढेच महाग आहेत.
कुठे तयार होतात अडकित्ते ?महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील मुरूड, उदगीर तर इतर राज्यांत करनाळे, जामनगर, जोधपूर, चेन्नई इ. ठिकाणी कलाकुसरीचे सुबक अडकित्ते तयार होतात. पण, आता कारागीर कमी झाले आहेत.
अशीच आहेत इतर नावे गुजराती, बंगाली, हिंदी, आसामी भाषेत काय म्हणतात ? गुजरातीमध्ये लहान अडकित्त्याला सुडी आणि मोठ्या अडकित्त्याला सुडो म्हणतात. बंगाली, आसामी या भाषांमध्ये अनुक्रमे सरौता, चरोता या नावाने अडकित्ता ओळखला जातो.
परंपरा ७०० वर्षे जुनीअडकित्ता हा शब्द सहाशे - सातशे वर्षे जुना आहे. अडकित्ता या शब्दाचा प्रथम उल्लेख रघुनाथ पंडित यांच्या राजव्यवहाराकोषात (१६७६) सापडतो. त्यापूर्वी महानुभावांच्या लिळाचरित्रात (तेरावे शतक) ‘पोफळफोडणा’ असा शब्द आढळतो, असे प्रा. अनिल मुंगीकर यांनी सांगितले.