लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्ज घोटाळ्याच्या मास्टरमाइंडला शहर पोलिसांच्या विशेष पथकाने एका हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या. या आरोपीने अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतरांना घोटाळा करण्याचा प्लॅन दिल्याची माहिती चौकशीतून समोर आली होती.
तेव्हापासून मास्टरमाइंड मुंबई, पुणे अशा विविध शहरांमधील आलिशान हॉटेलमध्ये लपून बसत होता. शनिवारी शहरात आल्यानंतर सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये असतानाच त्यास पकडले. या घोटाळ्यात पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे.
नामदेव दादाराव कचकुरे (५२, रा.शेंद्रा) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींच्या घोटाळ्यात अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह इतर पाच जणांना अटक केली आहे.
हॉटेलवर मारला छापा n अटक केलेल्या दोन आरोपींनी नामदेव कचकुरे हा घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. n मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये तो राहत होता. तेथून शनिवारी सकाळी तो शहरातील सिडको भागातील एका हॉटेलमध्ये उतरला. त्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळताच पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला आणि नामदेव कचकुरेला पकडले.
बनावट कर्ज प्रकरणात पटाईतनामदेव कचकुरे हा आदर्श नागरी पतसंस्थेच्या शेंद्रा येथील शाखेत कर्ज प्रकरणे पाहणारा कर्मचारी होता. त्या ठिकाणीच त्याने बनावट कागदपत्रे, संपत्ती दाखवून कर्ज मंजूर करण्याची योजनाच अध्यक्ष मानकापे याच्यासह दोन संचालकांना सांगितली. त्यानुसार, २०२ कोटी रुपयांचे बनावट कर्जांचे वाटप केल्याची कबुली अटकेतील व्यक्तींनी दिली होती.
कचकुरेची पत्नी शेंद्र्याची सरपंच नामदेव कचकुरे याची पत्नी शेंद्रा ग्रामपंचायतीची विद्यमान सरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामदेव हा ‘एनडी’ या नावाने फेमस असून, आदर्श पतसंस्थेत त्याचीच चलती होती, अशीही माहिती समोर आली आहे.