छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील मानकापे (५१) हा गुन्हा दाखल झाल्याच्या ३५ दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागला. अंबादासचा तो मोठा मुलगा असून, शुक्रवारी त्याच्या पत्नीला अटक केल्याचे समजताच, बुधवारी तो शहरात आला. सुनील येणार असल्याची माहिती पथकाला आधीच मिळाली होती. सकाळी मिलकॉर्नर परिसरात येताच, तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
११ जुलै रोजी २०२ कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला. मुख्य घोटाळेबाज अंबादासच्या अटकेआधीच मुले अनिल व सुनील हे पसार झाले. पोलिसांनी ११ ऑगस्ट रोजी दोघांच्या पत्नी सुनंदा व वनिता यांच्यासह देविदास अधानेची पत्नी सविताला अटक केली. चौघांनी आदर्श नागरी जनकल्याण प्रतिष्ठान व आदर्श नागरी दूध डेअरीच्या नावे कोट्यवधींचे बोगस कर्ज उचलले. न्यायालयाने त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
पत्नीला अटक, पती रुग्णालयातून बाहेरसुनील सातत्याने गावे बदलत फिरत होता. पुण्यात डेंग्यूची लागण झाल्याचे सांगून रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, पत्नीला अटक झाल्याचे कळताच, तो रुग्णालयातून बाहेर आला. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार यांना याची कुणकुण लागताच, त्यांनी सापळा रचून त्यास उचलले. त्याचा लहान भाऊ अनिल मात्र पसारच आहे.
आमच्या फक्त सह्या, कोटींची कल्पनाही नाहीएसआयटीने अंबादासच्या दोन्ही सुनांसह देविदासच्या पत्नीची कसून चौकशी केली. मात्र, तिघीही शेवटपर्यंत त्यांच्या जबाबावर ठाम राहिल्या. सासरे, पती आमच्या सह्या घेत गेले. आम्हाला शेवटपर्यंत त्यांच्या कोट्यवधींच्या कर्जाची माहिती नव्हती, आम्ही केवळ सह्या करत होतो, असे त्या सांगत होत्या. अंबादासच्या इतर संचालकांनीही अशाच प्रकारे जबाब दिले. त्यामुळे घोटाळ्याचा सर्व रोख आता अंबादास, त्याची दोन मुले व देविदासवर येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.