वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उतरणाऱ्या भावी सदस्यांकडून थकीत कराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात झुंबड उडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत चांगलीच भर पडत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी केली आहे. या बड्या ग्रामपंचायतींत वर्णी लागावी, यासाठी गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन भावी उमेदवारांकडून दिले जात आहे. या भागातील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, पंढरपूर, नारायणपूर, वळदगाव, पाटोदा, अंबेलोहळ आदी अर्थिकदृष्टया संपन्न ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जुळवा-जुळव सुरू केली आहे. सद्यस्थितीत गावात पॅनल तयार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथान बैठका सुरू आहेत. प्रत्येक वॉर्डातील जातीनिहाय, सक्षम तसेच वाॅर्डात चांगला जनसंपर्क असलेल्या उमेदवारांचा प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शोध घेण्यात येत आहे. या बड्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येकी चार-पाच पॅनल राहणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर अपक्ष म्हणून अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी केली आहे. आपल्या वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, यासाठी सक्षम उमेदवारांकडून त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र वाळूजमहानगर परिसरात आहे.
थकीत करामुळे तिजोरीत भर पडणार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांकडून ग्रामपंचायतीचा थकीत कराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी करीत आहेत. थकबाकी असलेल्यांना निवडणूक लढविता येत नसल्यामुळे अनेकांनी उधारी-उसनवारी करून तसेच स्वत:जवळ जमा असलेल्या पैशातून थकीत कराचा भरणा करीत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थकीत कर भरण्यासाठी झुंबड उडाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत चांगलीच भर पडणार असल्याचे रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोहकले, जोगेश्वरीचे बी. एल. भालेराव, वाळूजचे एस. सी. लव्हाळे, वळदगावचे श्रीकांत पालवे, पंढरपूरचे नारायण रावते आदींनी लोकमतला सांगितले. बुधवारपासून नामांकन अर्ज स्वीकारले जाणार असल्यामुळे थकीत कर भरणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
---------------------------