सिल्लोड : शहरातील एका ६५ वर्षीय महिलेस पोटाचा विकार असल्याने त्या उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात गेल्या होत्या. तेथील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली असता तिला शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. येथे चाचणीमध्ये त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेला मुलगा चार दिवसांपूर्वी सिल्लोडमध्ये येऊन गेल्याच्या माहितीने सिल्लोडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
तालुक्यातील आणवा येथील महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका, वाहन चालक असे ७ लोक व शिवना येथील कोरोना बाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेले आरोग्य विभागाचे १८ कर्मचारी असे २५ लोकांचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. यामुळे काही अंशी दिलासा मिळत नाही तो शुक्रवारी पहाटे सिल्लोड शहरात अबदलशा नगर येथील एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची ,माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.
सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अमित सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित महिलेचे महिलेचे दोन मुले त्यांच्या सोबत आहेत. एक मुलगा चार दिवसांपूर्वी सिल्लोड येथे येऊन गेला होता. स्थानिक प्रशासनास याची माहिती गुरुवारी संध्याकाळी उशिरा प्राप्त झाली. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने महिला रहात असलेला अबदलशा नगर झोपडपट्टी परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे.
दरम्यान, तहसीलदार रामेश्वर गोरे, नगर परिषदचे मुख्याधिकारी सैयद रफिक, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, देवेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, रुग्ण कल्याण समितीचे माजी सदस्य हाजी मोहंमद हनिफ यांनी अबदलशा नगर येथे भेट देऊन तेथील परिसर सील केला. या भागातील 26 कुटुंबांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.