प्रताप नलावडे बीडदररोज पालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलत असल्याने शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रचाराला सुरूवात होत असतानाच अनेक वेगवान घडामोडींमुळे बेरीज-वजाबाकीचा नवा ‘खेळ’ सुरू झाला आहे. बीड पालिकेची निवडणूक सध्या तरी क्षीरसागर या नावाभोवतीच फिरत आहे. क्षीरसागर यांच्या घरातच दोन भाऊ नगराध्यक्षपदासाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. कुटुंब प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची नेमकी काय भूमिका या निवडणुकीत राहणार याची अनेक दिवसापासून चर्चा सुरू असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचाच आपण प्रचार करणार असल्याचे सांगत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबतच आपण राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असणारे दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर हे आता काय करणार, याची चर्चा सुरू झाली होती. आ. क्षीरसागर यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार सय्यद सलीम व माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी रविवारी रवींद्र क्षीरसागर यांच्यामागे आपली ताकद उभी करीत अण्णांना धक्का दिला. एक जयदत्तअण्णा माझ्या सोबत नसले तरी आता सय्यद सलीम आणि जगताप हे दोघे माझे भाऊच आहेत, असे सांगत रवींद्र क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या रिंगणात थेट दोन भावांनाच आव्हान दिले.रवींद्र क्षीरसागर यांची आजवरची राजकारणातील भूमिका ही पडद्यामागे राहून दोन भावांना मदत करण्याइतपतच मर्यादित होती. यावेळी पहिल्यांदाच ते थेट राजकीय मंचावर आल्याने क्षीरसागर विरूध्द क्षीरसागर असा रंग निवडणुकीला चढू लागला आहे. पंचवीस वर्षाचा राजकीय अनुभव पाठीशी असणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनीही माजी आमदार जनार्र्दन तुपे यांना आपल्या सोबत घेतले आहे. दरम्यान जयदत्त क्षीरसागर हेही निवडणुकीत सक्रिय झाले असून कार्यकर्त्यांच्या बैठकीसोबतच त्यांनी प्रत्येक उमेदवाराशी सोमवारी थेट संवाद साधून व्यूहरचना केली आहे. माजी नगराध्यक्षा दीपा क्षीरसागर यांनी महिलांच्या बैठका घेण्याचा धडाका सुरूच ठेवला असून त्यांनी डोअर टू डोअर प्रचारही सुरू केला आहे.एमआयएम आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे हे पहिल्यांदाच पालिका निवडणुकीत उतरले असल्याने त्यांच्यामुळेही कोणती नवी समीकरणे तयार होणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. रिपाइंने सुरूवातीला एकला चलो रे अशी घेतलेली भूमिका बदलून शिवसेना आणि भाजपची युती फिसकटल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला बळ मिळाले आहे. गत निवडणुकीत विरोधकांची मोट बांधत क्षीरसागरांच्या विरोधात लढलेले आणि कशीबशी एक जागा आपल्या पदरात पाडून घेतलेले माजी आमदार सुरेश नवले यावेळी निवडणुकीपासूनच अलिप्त आहेत. त्यांच्या अलिप्त राहण्याचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, याचेही आराखडे आता बांधले जाऊ लागले आहेत.एकंदरीतच, दिवसागणिक राजकीय घडामोडी वळण घेत असल्यामुळे समीकरणे बदलू लागली आहेत. त्यामुळे बीड पालिकेची निवडणूक रोमांचक होण्याची शक्यता आहे.
बीड पालिकेमध्ये बेरीज-वजाबाकीचा नवा ‘खेळ’
By admin | Published: November 15, 2016 1:02 AM