- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे मराठवाड्यात उसाचे उत्पादन घटले. त्यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपासून कुठल्याच सहकारी साखर कारख्यान्यात बॉयलर पेटण्याची शक्यता कमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजी साखर कारखाना सुरू होऊ शकतो. तो विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अधिपत्त्याखाली चालतो. अन्य साखर कारखान्यांना ऊसच उपलब्ध नाही.
यंदा परतीचा व नंतर अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे रान दुरुस्त करायलाच अवधी लागेल व त्यानंतर उसाची लागवड केली जाऊ शकते. महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केल्यास एकीकडे महापूर व दुसरीकडे दुष्काळ यामुळे राज्यातील उसाच्या उत्पादनात यंदा तीनशे लाख टनांनी घट येण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनही ५० लाख टनांनी घटेल, अशी माहिती मिळत आहे. राज्यात सुरुवातीच्या अंदाजानुसार ८४३ लाख टन उसाची उपलब्धता ५७० लाख टनांवरून आता ५०० लाख टनांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात देशातही आहे. मागील हंगामात देशात ३२६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात तब्बल ९५१ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
यावर्षी खरेतर तीच स्थिती होती. मात्र, दुष्काळाने आणि महापुराने उत्पादनाच्या विक्रमावर पाणी फिरवले. येणाऱ्या हंगामात राज्यातील यापूर्वी हंगाम घेतलेल्या १९५ साखर कारखान्यांपैकी किमान ५० कारखाने बंद राहतील. उरलेल्या कारखान्यांना त्यांच्या क्षमतेएवढा ऊस मिळणार नाही. यावर्षी साखरेचे उत्पादनही ५५ लाख टनांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक स्तरावर गेल्या वर्षातील अतिरिक्त साखर उत्पादनानंतर यंदा उत्पादन ६० ते ६५ लाख टनांनी कमी होणार आहे. अशा स्थितीतही साखरचे मागणी कायम राहून पुरवठा अपुरा राहणार आहे. त्यामुळे भारताला निर्यातीची संधी अधिक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
साखर सहसंचालकपद रिक्त गेल्या सहा महिन्यांपासून औरंगाबादचे साखर सहसंचालकपद रिक्त आहे. हे कार्यालय क्रांतीचौकात आहे. या पदावर कार्यरत महिला अधिकारी येथून बदलून गेल्यापासून ते रिक्तच आहे. शिवाय कर्मचाऱ्यांची संख्याही पुरेशी नाही.