छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत कोटींच्या घोटाळ्यात मुख्य व्यवस्थापक देवीदास सखाराम आधाने (५२, रा. एन-११) याच्या उपस्थितीत व सहीनेच प्रत्येक व्यवहार झाला. पसार झाल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचा संशय असून, त्या अंगाने तपास करायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आधानेच्या प्राथमिक चौकशीत उपनिबंधक कार्यालयाविषयी नव्याने स्फाेट असून, नव्याने आरोपी होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दोन गुन्हे दाखल झाल्यापासून चार महिने आधाने पसार होता. सिडको पोलिस ठाण्यात नुकताच त्याच्या वैयक्तिक यशस्विनी संस्थेतील ४८ कोटींच्या घोटाळ्याचा तिसरा गुन्हा दाखल झाला. त्याच्याच आणखी एका संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी चौथा गुन्हा दाखल होण्याचीदेखील पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर मात्र आधाने ११ ऑक्टोबर रोजी शहरात दाखल झाला. तेव्हाच आर्थिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या.
गुरुवारी सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद यांनी त्याला दुपारी न्यायालयात हजर केले. सर्व बाेगस कर्ज प्रकरणांवेळी आधाने हजर होता, त्या प्रत्येक कागदावर जागोजागी त्याचे हस्ताक्षर आहे, गुन्हा घडल्यापासून आरोपी पसार होता, त्यामुळे त्याने पुरावे नष्ट केले आहेत का, याचा तपास करायचा असल्याची बाजू सरकारी पक्षाने मांडली.
आता कोण अडकणार?उपनिबंधक कार्यालयाला मानकापेकडून वर्षाला 'टोकन' जायचे, असा खुलासा आधाने याने केला. शिवाय, पैसे कुठे जायचे, कसे जायचे याविषयी आधाने खुलासे करत आहे. सर्वांना मानकापे काय करतोय, हे माहीत होते. काही झालेच, तर मानकापे कोट्यवधींची संपत्ती विकून पैसे देईल, असे वाटत हाेते. मात्र, त्याने एकही रुपया भरला नाही, असे कबूल केल्याचे सूत्रांनी सांगितले. आता त्या अनुषंगाने पोलिसांनी पुरावे गोळा करणे सुरू केले असून, आरोपी वाढण्याची दाट शक्यताही व्यक्त केली.