औरंगाबादऔरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
"पुढे पुढे पाहा काय होतंय... महाविकास आघाडीचं एकमत करुनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच या शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही प्राधान्याने सोडवत आहोत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्याला आणखी बळ मिळालं आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
संभाजीनगरचा प्रस्ताव लवकरच- सुभाष देसाईऔरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव लवकरच महाविकास आघाडी सरकार आणणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. त्यामुळे नामांतरणाला काँग्रेसचा स्पष्ट विरोध असतानाही देसाई यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. "राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच औरंगाबादच्या नावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाजाचा उल्लेख का करावा? संभाजी राजेंच्याच नावानं हे शहर ओळखलं जावं, अशी भूमिका स्वत: मुख्यमंत्र्यांनी याआधीही मांडली आहे", असं सुभाष देसाई म्हणाले.
नामांतरणाचा वाद चिघळणारऔरंगाबादचे नामांतरण करण्याला काँग्रेसने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट नकार दिलाय. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मात्र संभाजीनगर असं नामांतरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.