औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची मुठ बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. ही यात्रा आज औरंगाबाद शहरात आली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.
संबंधित बातमी- 'माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला..? सर्व चांगलं सुरू असताना गद्दारी का केली..?'
'उद्धव ठाकरेंना प्रेम दिलं'शहरातील संत एकनाथ नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव हे उद्धव ठाकरेंनी दिलं. सरकार आल्यानंतर रायगडच्या डागडुजीसाठी पहिला प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारने दिला होता, त्यानंतर संभाजीनगर हा शेवटचा. मी काही दिवसांपासून राज्यात फिरत आहे, यादरम्यान मला उद्धव ठाकरेंसाठी तुमच्या डोळ्यात प्रेम दिसलं. प्रत्येक ठिकाणी मेळाव्यात प्रेम मिळालं.'
'गद्दारांबद्दल बोलावं लागतंय'ते पुढे म्हणाले की, 'सकाळी नाशिकमध्ये राम आणि संध्याकाळी इथे मारुतीचे दर्शन घेतले. हे राम आणि मारुतीचे नाते निष्ठेचे, पण यांचे दर्शन घेऊन गद्दरांबाबत बोलावं लागत आहे. आमच्या सर्व प्रस्तावांना नव्या सरकारने स्थगिती दिली. आम्ही दंगली न करता नामकरण केलं हे नव्या सरकारच्या पोटात दुखतय. मविआच्या काळात जातीयवाद दंगली न होता सरकार चाललं,' असंही ते म्हणाले.