छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती कुठे आणि किती आहे, असा प्रश्न विचारला होता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील प्रचार सभेत बोलले. याविषयी बोलताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या व्यक्तीने ते गेल्यानंतर शिवसेनेत जी काही पदे घ्यायची होती, ती घेतली. अगदी मंत्रिपदांपर्यंत खोटे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देत नाही. त्यांना जनताच उत्तर देईल, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आयोजित सभेसाठी सोमवारी शहरात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बेरोजगारी वाढत आहे. महागाई वाढत आहे. यावर ही निवडणूक आहे. शिवसेना (उबाठा) पक्ष म्हणून आमचे विषय हे देशाचे आहेत. एअर फोर्सच्या एका ताफ्यावर काल हल्ला झाला. निवडणुकीच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा वाढविली जाते. या काळात असा हल्ला झाला. कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवाद संपला, असे सांगितले होते. देशभरात महागाई, बेरोजगारी वाढत असून, भाजपने मुद्यावर बोलावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. छत्रपती संभाजी नगरात निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढत आहे. यात निष्ठावान लोकांचा विजय होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
सगळे उद्योग गुजरातला पाठविलेआदित्य ठाकरे म्हणाले, भाजप सरकारने गेल्या दोन अडीच वर्षात सगळे उद्योग गुजरातला पाठविले. मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाही. मात्र, महाराष्ट्राला गुजरातसाठी अशी वागणूक का दिली जाते, असा प्रश्न आहे. सगळे उद्याेग गुजरातला जात असल्याने इथल्या तरुणांचा बळी जात आहे. ग्राफिक डिझाईनरसाठी मुंबईतील जाहिरातीत मराठी माणसाला बंदी असल्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, यावर आम्ही आंदोलन करीत आहोत. पुढे पुन्हा भाजपचे सरकार डाेक्यावर बसले तर प्रत्येक मराठी माणूस, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसह इतर राज्यातील लोकांना गुजरातसाठी हीच वागणूक मिळेल.