सिल्लोड (औरंगाबाद): शहरात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र, पूर्वीची जागा नाकारून सिल्लोड पोलिस व नगर परिषदेने त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील खुल्या मैदानावर सभेसाठी परवानगी दिली आहे. आज सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे ठिकाण ठरले.
आदित्य ठाकरे यांची ७ नोव्हेंबरला सिल्लोड येथील महावीर चौकात सभा होणार होती. त्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोड पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. तर दुसरीकडे त्याच दिवशी महावीर चौकाच्या अगदी समोर जिल्हा परिषद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. दरम्यान, पोलिसांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी दिली. मात्र आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने बैठक घेत आदित्य ठाकरे यांच्या सभेस ठिकाण बदलून परवानगी दिली.
सत्तार यांचे आव्हान स्वीकारत आदित्य सिल्लोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान छोटा पप्पू म्हणून सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. सत्तार यांच्या आरोपाला थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ७ नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये सभा घेण्याची घोषणा केली. आदित्य यांनी सभेची घोषणा करताच अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोडमध्ये खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. आता शिंदे यांच्या सभेतून पुन्हा एकदा अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. आदित्य विरुद्ध सत्तार आणि शिंदे असा सामना येत्या सोमवारी होत असल्याने राजकारण आतापासून चांगलेच तापले आहे.
चौकात परवानगी देता येत नाहीआदित्य ठाकरे यांच्या सभेला महावीर चौकात परवानगी मागितली होती. न्यायालयाच्या आदेश आहे चौकात परवानगी देता येत नाही म्हणून महावीर चौकातील परवानगी नाकारली आहे. त्यांना जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका जवळ खुल्या मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिली आहे.- अशोक मुदिराज पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर