जालना : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून सरकार तसेच प्रशासनाने चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांना पाठविलेल्या पत्राव्दारे केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर विविध खात्यांचे मंत्री बदनापुरात दाखल झाले. त्यांनी परिस्थिती पाहणी केली. त्यावेळी पंधरा दिवसाच्या आत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या घटनेला दोन-तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालीच नाही.परतूर तालुक्यातील पिंपरखेडा, श्रीधरजवळा यासह २७ गावांतील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान होऊनही वगळण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील वरूड येवता, भाटी पासोडी यासह काही गावेच यादीतून वगळले. अंबड तालुक्यातील बहुभूधारक शेतकऱ्यांना यादीतून वगळले. घनसावंगी तालुक्यातील ७४ हजार १६७ शेतकरी बाधित असताना फक्त १२ हजार ८८२ शेतकऱ्यांनाच मदत जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातील ५२ गावातील शेतकऱ्यांनी तहसीलसमोर उपोषण करून मदतीची मागणीही केली होती.जालना तालुक्यातील नेर, सेवली सर्कलसह ४५ गावांचे नुकसान झाले आहे. मात्र फक्त २२ गावांचा यादीत समावेश केला आहे. भोकरदन तालुक्यातील काही गावांच्या याद्या बँकेकडे देण्यात आल्या परंतु बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली नसल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. जालना तालुक्यातील दहिफळ, उमरी, धारा, उखळी, गुंडेवाडी या गावांतील काही शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची टीका केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, मदनलाल सिंधी, दीपक ठाकूर, संजय तौर, बाबूराव खरात, मोहन बाहेकर, उमाकांत मानवतकर, राम माने, गणेश खवने, कृष्णा जिगे, सुधाकर खरात, ज्ञानेश्वर शेजूळ, सुभाष पालवे, शहाजी राक्षे गणपतराव सातपुते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रशासनाने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले- लोणीकर
By admin | Published: June 12, 2014 11:51 PM