- मनीषा म्हात्रे, मुंबई
गेल्या सहा महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात खोटी कागदपत्रे सादर करुन दोन किडनी प्रत्यारोपण झाल्याची धक्कादायक माहिती खात्रीलायक सुत्रांकडून लोकमतला मिळाली आहे. याबाबतची कागदपत्रे अधिक चौकशीसाठी आरोग्य संचालनालयच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागाकडे पाठविण्यात आली आहेत. तसेच या किडनी रॅकेट प्रकरणातील रुग्ण आणि किडनी दाता महिलेलाही पवई पोलिसांनी अखेर मंगळवारी अटक केली. मुळचे गुजरात येथील रहिवासी असलेले ब्रीजकिशोर लक्ष्मण जैस्वाल (४८) यांनी किडनीसाठी या रॅकेटला २१ लाख मोजले होते. भेजेंद्र हिरालाल भिसेन, इक्बाल अहमद सिद्धिक खान, भारतभूषण बलदेवसिंग शर्मा, ख्वाजा पटेल यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करुन शोभा ठाकोरला त्यांची खोटी पत्नी बनवून किडनी दाता म्हणून तयार केले. ठाकोरला यासाठी दोन लाख रुपये देण्यात आले होते. तर यामागील मास्टरमाईंड असलेला हिरानंदानी रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपण समन्वयक निलेश कांबळेला ८ लाख ५९ हजार देण्यात आले होते. १२ जुलै रोजी जैस्वाल यांच्या प्रत्यारोपणाची बनावट कागदपत्रे सादर करुन कांबळेने लोकल आॅथोरायझेशन कमिटाकडून प्रत्यारोपणासाठी हिरवा कंदिल मिळविला. १४ जुलैला शस्त्रक्रिया सुरु असतानाच पवई पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणात मंगळवारी किडनी दाता रेखादेवी उर्फ शोभा ठाकोरसह रुग्ण जैस्वालला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ कांबळेच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. त्याने गेल्या सहा महिन्यात खोटी कागदपत्रे सादर करुन दोन किडनी प्रत्यारोपण केली आहेत. याबाबतची मानवी अवयव प्रत्यारोपणाचे कागदपत्रे चौकशीसाठी सहाय्यक संचालकांकडे पाठविण्यात आली आहेत. मात्र विभागाकडून याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पवई पोलिसांनी दिली. याप्रकरणांमुळे हिरानंदानी रुग्णालयात अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय लोकल आॅथोरायझेन कमिटीवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणामुळे किडनी रॅकेटची व्याप्ती अधिकच वाढली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.