औरंगाबाद : पाणीपुरवठा वगळता स्मार्ट सिटीतील सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा महापालिकेने, तर पर्यटनवृद्धीसह स्वयंरोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन २०१८ या वर्षात करण्यात येणार्या संकल्पित विकास कामांची माहिती माध्यमांना देण्याच्या सूचना केल्या होत्या. शहराला पाणीपुरवठाच होत नाही, तर शहर कसे स्मार्ट होणार, यावर आयुक्त मुगळीकर म्हणाले, समांतरचे प्रकरण कोर्टात आहे. त्यातील अडचणी दूर होतील, योजना सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; परंतु मनपाकडे स्वतंत्र काय व्यवस्था आहे, हे त्यांनी सांगितले नाही. शहराची गरज २२५ एमएलडी असून, १२५ एमएलडी पाणी येते. दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिकेचा संकल्प असाआयुक्त मुगळीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. २६ जानेवारीला सोलर सिस्टिमचे उद्घाटन होईल. १४८ कोटींचा एकात्मिक कार्यक्रम सुरू होईल. २ हजार सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट बसस्टॉप, ११७८ वायफाय स्पॉट हे सर्व ९ महिन्यांत पूर्णत्वास जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन स्मार्ट रोडवर सायकल ट्रॅक, हर्सूल तलाव परिसरात सायकल ट्रॅक केला जाईल. १५० सिटीबस घेण्यात येतील. ५५ हजार एलईडी बल्ब बसविण्यात येतील. इलेक्ट्रिक रिक्षा कचरा संकलनासाठी येतील. ५ इलेक्ट्रिक बससह १५० कोटींचे रस्ते केले जातील. भूमिगत गटार योजनेचे काम झाले आहे. नारेगाव कचरा डेपो कचरामुक्त करण्यात येईल.
जिल्हा प्रशासनाचा संकल्पपाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येईल. मुद्रा योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ४५८ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा अंतिम करून पर्यटनस्थळांचा विकास केला जाईल. घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास, गतिमान प्रशासन, प्लास्टिकमुक्त औरंगाबाद, स्वच्छ भारत अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केला. पर्यटनवृद्धीला प्राधान्य असेल. मार्च अखेरपर्यंत आराखडा मंजूर केला जाईल. समृद्धी महामार्ग भूसंपादन, आॅनलाईन फेरफार, मुद्रा योजनेकडे लक्ष देण्याचेही त्यांनी नमूद केले. शेततळे, गाळ काढणे, शेतकरी कर्जमुक्ती या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला.