औरंगाबाद : जी-२० परिषदेपूर्वी औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या रस्त्याचे १५ टक्के काम शिल्लक असून, जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाला अजिंठा लेण्यांपर्यंत सुलभपणे जाता यावे, यासाठी हा रस्ता पूर्ण होणे गरजेचे असून, त्या दिशेने प्रशासन कामाला लागले आहे.
या रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा सिमेंट काँक्रीटचा असलेला चौपदरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्णपणे वापरता येत नाही. भूसंपादनाची काही किरकोळ प्रकरणे, वनविभाग आणि बांधकाम विभागाकडील काही मुद्यांमुळे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कामासाठी १ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. हे काम धुळे व औरंगाबाद बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात येत आहे. यासाठी तीन कंत्राटदारांनी काम केले आहे. आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडल्यानंतर नव्याने कंत्राटदार नेमण्यात बराच काळ गेला. २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींसह एक शिष्टमंडळ याच रस्त्याचे अजिंठा लेणी पाहण्यासाठी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून हा रस्ता चर्चेचा मुद्दा बनलेला आहे.
दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजेजी-२० परिषदेपूर्वी अजिंठा लेण्यांपर्यंत दुपदरी रस्ता तरी पूर्ण झालाच पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले; तसेच अजिंठा घाटातील कामाच्या निविदा अंतिम झाल्या असून, आठ दिवसांत काम सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला. दोन ते तीन टप्प्यांत १० ते १५ टक्के काम बाकी आहे. रस्त्याचे इतर कामे पूर्ण झाली आहेत.
हर्सूल रस्त्याला लवकरच मंजुरी : जिल्हाधिकारीहर्सूल रस्त्यासाठी किमान १५ कोटी रुपये लागणार आहेत. त्याबाबतची माहिती शुक्रवारी शासनाला ‘व्हीसी’मध्ये सादर करण्यात आली. या कामासाठी १९ कोटींची मागणी होती, बांधकाम विभागाने त्यातील त्रुटी दूर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुधारित प्रस्ताव शासनासमोर मांडला. या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला.