औरंगाबाद : लस घेतल्याशिवाय पेट्रोल, पगार, रेशनसह शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश नाही, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्याने शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा दिसून आल्या ( Queues For Corona Vaccination In Aurangabad ). या रांगा पाहून महापालिका प्रशासनाने लसीकरणाची वेळ दोन तास वाढविण्याचा मोठा निर्णय तातडीने घेतला. सकाळी १० वाजता सुरू होणारे लसीकरण आता ९ वाजता सुरू होईल. सायंकाळी ५ वाजताऐवजी आता ६ वाजतापर्यंत लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
कोरोनासाठी महापालिकेने तब्बल ७०० कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले होते. पगारासाठी निधी मिळत नसल्याने १३६ कर्मचारी वगळून सर्वांना नोकरीवरून काढण्यात आले. अत्यल्प मनुष्यबळावर दररोज तब्बल ७० ठिकाणी लसीकरण, कोरोना तपासण्या करणे प्रशासनाला अवघड जात आहे. त्यामुळे ६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू केले. खास लसीकरणासाठी घाटी रुग्णालयाकडून १० कर्मचारी घेतले. तरीही कर्मचारी कमीच पडत आहेत.
बुधवारी तर शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर किमान ४०० ते ५०० नागरिकांच्या रांगा लागल्या. हे पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना धडकीच भरली. जेथे सर्वाधिक रांगा होत्या, तेथे कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथक पाठविण्यात आले. जिन्सी, शहाबाजार, सिडको एन-८, बन्सीलाल नगर केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. विशेष बाब म्हणजे दुसरा डोस घेण्याची मुदत काही महिन्यांपूर्वी संपलेली असताना आता लस घेण्यासाठी नागरिक असल्याचे निदर्शनास आले. लसीकरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेतील माजी सैनिक अनेक केंद्रांवर तैनात केले.
चार मोबाइल पथकलस घेण्यासाठी अनेक नागरिक केंद्रांवर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चार रिक्षा लावून घरोघरी जावून लस देण्याची माेहीम बुधवारपासून सुरू केली. या रिक्षांवर भोंगाही लावण्यात आला आहे. आधार कार्ड दाखवा लस घ्या, अशी मोहीम सुरू करण्यात आली.
सिरिंजचा साठा प्राप्तमहापालिकेला ७५ हजार सिरिंजचा साठा बुधवारी सकाळी प्राप्त झाला. जिल्हा परिषद, आरोग्य उपसंचालक आदी विभागांकडे मोठ्या प्रमाणात साठा पडून आहे. यापूर्वी मनपाने त्यांना सिरिंज दिलेले आहेत. त्यामुळे सिरिंजअभावी लसीकरण मोहीम बंद पडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मंडलेचा यांनी सांगितले.