लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : बिलोलीपाठोपाठ देगलूर बाजार समितीवरही भाजपाप्रणीत प्रशासकीय मंडळ आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रशासकीय मंडळाचे चेअरमन म्हणून माधवराव पाटील सुगावकर यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. यामुळे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावत आहेत. देगलूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाची मुदत संपुष्टात येऊन बराच काळ उलटला असून सध्या सहायक निबंधक (सहकारी संस्था) हे प्रशासक आहेत. संचालक मंडळाची निवडणूक होईल तेव्हा होईल, परंतु तोपर्यंत प्रशासकाऐवजी भाजप कार्यकर्त्यांचे प्रशासकीय मंडळ स्थापित करण्याच्या हालचाली सुरु आहेत. माधवराव पाटील सुगावकर यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद देण्याच्या अटीवरच भाजपप्रवेश केला असल्याची उघड चर्चा स्थानिक भाजपबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे प्रभावित होऊन माधवराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणूक काळामध्येच हा प्रवेश होणार होता. स्थानिक कार्यकर्त्यांनादेखील याची पूर्ण कल्पना आहे.भाजपमध्ये प्रवेश करताना पदासंबंधी कोणती अट मान्य केली जात नाही अथवा पदासंबंधी कोणते आश्वासन दिले जात नाही, असे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी सांगितले. देगलूर बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आणण्याच्या हालचालीसाठी भाजपमधील खतगावकर समर्थकांच्या सहकारमंत्र्यांकडे वाऱ्या चालू आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार माधवराव पाटील यांचा झालेला सशर्त भाजपप्रवेश या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष रातोळीकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये नेमके तथ्य काय? हे लवकरच स्पष्ट होईल.
बाजार समितीवरही प्रशासकीय मंडळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:17 AM