- मूजीब देवणीकर
औरंगाबाद : महापालिका निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने केली. १९९५ मध्ये उत्तम प्रशासक म्हणून कृष्णा भोगे यांनी महापालिकेत काम केले. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
१९८२ मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना झाली. पहिले प्रशासक म्हणून ८ डिसेंबर १९८२ रोजी सतीश त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारला. १९८८ पर्यंत विविध प्रशासकांनी महापालिकेत काम केले. आपल्या कामाचा ठसा त्रिपाठी यांनी चांगलाच उमटविला होता. १९८८ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. महापौर निवडणुकीच्या निकालावरून शहरात दंगल उसळली होती. या दंगलीमुळे तत्कालीन पोलीस अधिकारी टी.सी. वानखेडे यांनी शहरात संचारबंदी लागू केली होती.
१९९३ पर्यंत ६० नगरसेवकांच्या सभागृहाने आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर शासनाने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. कर्तव्यदक्ष अधिकारी कृष्णा भोगे यांची १४ जून १९९४ मध्ये प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १ जुलै १९९६ मध्ये शहरातील राजकीय मंडळींनी तत्कालीन सेना-भाजप युती सरकारवर दबाव टाकून भोगे यांची बदली केली. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भोगे यांनी शहरात उत्तम काम केले. २५ वर्षांपूर्वी भोगे यांनी शहरातील प्रत्येक चौकाचे महत्त्व लक्षात घेऊन सुंदर वाहतूक बेट तयार केले होते. अत्यंत कमी निधीमध्ये भोगे यांनी शहराच्या सौंदर्यीकरणावर भर दिला होता. नंतर महापालिकेला हे वाहतूक बेट नीटपणे सांभाळताही आले नाहीत. आता पुन्हा एकदा महापालिकेवर प्रशासक येणार आहे. यामुळे नव्या प्रशासकाच्या काळात शहरात कसे काम होते, याकडे जनतेचेही लक्ष असणार आहे. २९ एप्रिल २०२० रोजी महापालिकेतील विद्यमान ११५ नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या असल्याने ३० एप्रिलपासून मनपावर प्रशासक नेमण्यात येईल. प्रशासक म्हणून राज्य शासन कोणाला पसंती देईल, हे अद्याप निश्चित नाही.
महापालिकेवर नेमलेले आजपर्यंतचे अधिकारीनाव कार्यकाळसतीश त्रिपाठी ८-१२-८२ ते ०३-०३-१९८४एस. शंकर मेनन ०३-०३-१९८४ ते ०४-०९-१९८४मनमोहन सिंह ०१-११-१९८४ ते २३-०२-१९८६अरविंद रेड्डी २४-०२-१९८६ ते २९-०२-१९८८कृष्णा भोगे १४-०६-१९९४ ते ०१-०७-१९९६.....