औरंगाबाद : औरंगाबादचा विद्यार्थी अमेरिकेतील एका नामवंत उद्योगाचा उपाध्यक्ष होतो, ही बाब येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. समीर प्रभाकर डोरले, असे त्याचे नाव आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत प्रा. प्रभाकर रामचंद्र डोरले यांचे ते चिरंजीव आहेत.
समीर डोरले यांचे शालेय शिक्षण स. भु. शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेतली. समीर यांनी त्यानंतर वाळूज येथील बजाज ऑटोमध्ये ५ वर्षे नोकरी केली. मात्र, उच्चशिक्षणाचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ते अमेरिकेला गेले. तेथे एमएस तसेच एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर ते अमेरिकेतील सेंट लुईस येथे ‘वॉटलो’ कंपनीत नोकरीसाठी रूजू झाले. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांना तीन वर्षांत पदोन्नती व उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर पुन्हा ५ वर्षांत पदोन्नतीद्वारे ते प्रॉडक्शन डायरेक्टर झाले.
ही कंपनी इंडस्ट्रीअल हिटर्स तयार करत असून, अमेरिकेशिवाय इंग्लंड, जर्मनी व आशियात चीन, जपान, कोरिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, भारत आदी देशांत त्यांचे उत्पादन, कार्यालये व विक्री केंद्रे आहेत. चीनमध्ये डायरेक्टर आशिया म्हणून ते गेली १२ वर्षे कार्यरत होते. कंपनीने त्यांना उपाध्यक्षपदी नियुक्त केले असून, कंपनीच्या कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या मलेशियात ते कंपनीचे नवे युनिट सुरू करत आहेत.