औरंगाबाद : वर्ल्ड स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय आयटीआयच्या पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. आयटी नेटवर्क सिस्टम ॲडमिन या विभागात विश्वजित भारुके (सुवर्ण), अविनाश बोरुडे (कास्य), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये जीवन चौधरी (रौप्य), मोहम्मद फैजल (कास्य) क्लाऊड काॅम्पुटिंगमध्ये यश पाटील (रौप्य) हे विजेते ठरले.
जिल्हा, विभागीय स्तरावर निवडीनंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये २६३ उमेदवार सहभागी झाले होते. या स्पर्धेचा निकाल रविवारी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत जाहीर झाला. यावेळी प्रधान सचिव मनीषा शर्मा, स्किल इंडियाचे अध्यक्ष प्रकाश शर्मा, संचालक दिगंबर दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती, असे प्राचार्य अभिजित आलटे यांनी सांगितले.
महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी ४५ कौशल्य श्रेणींमध्ये ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ३ सप्टेंबरला कुर्ला (मुंबई) येथील डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे झाला. रविवार लोअर परेल, मुंबई येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यस्तरीय विजेत्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स २०२१ विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर २०२१ मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यातून निवडलेले विद्यार्थी हे अंतिम स्पर्धेत सहभागी होतील, असे प्राचार्य आलटे म्हणाले.