औरंगाबाद : विद्यापीठातील काही विनाअनुदानित अभ्यासक्रमाला मागील पाच वर्षांपासून दोन किंवा तीनच प्रवेश असून, हे अभ्यासक्रम म्हणजे पांढरा हत्ती सांभाळण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे अधिष्ठाता मंडळाने या अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन काही अभ्यासक्रम बंद, तर काही अन्य विद्याशाखांमध्ये समाविष्ट करण्याच्या शिफारसी कुलगुरूंकडे केल्या जाणार आहेत.
यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘नॅक’ मूल्यमापनासाठी आलेल्या समितीने विद्यापीठावर आर्थिक भार असणारे अभ्यासक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अशा विनाअनुदानित अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिष्ठाता मंडळाला दिल्या होत्या. त्यानुसार सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस या विषयावर अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
यामध्ये संस्कृत, जर्मन भाषा, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, एम.एफ.ए., संगणकशास्त्र विद्याशाखेतील एम.टेक. डान्स, म्युझिक, लाईफ लाँग लर्निंग एम.ए., अशा अनेक विनाअनुदानित अभ्यासक्रमाला दोन किंवा तीनच विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. यासाठी विद्यापीठ फंडातून तासिका तत्त्वावर शिक्षक नेमले जातात. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी यातील जवळपास ७-८ अभ्यासक्रम बंद करण्यावर अधिष्ठाता मंडळाचे एकमत झाले असून, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ हे लवकरच यासंबंधीचा अहवाल कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याकडे सादर करणार आहेत. कुलगुरूंच्या अवलोकनानंतर अधिष्ठाता मंडळाच्या शिफारसी विद्या परिषदेसमोर ठेवल्या जातील. त्यानंतर व्यवस्थापन समितीसमोर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
स्कूल सिस्टीम सुरू करण्याच्या हालचालीमुंबई, अमरावती, जळगाव विद्यापीठांप्रमाणे डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही चार-पाच अभ्यासक्रम मिळून स्कूल सिस्टीम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. उदा. स्कूल ऑफ फाईन आर्ट, स्कूल ऑफ लँग्वेज अशी स्कूल सिस्टीम राहील. या विषयावरही अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये त्या त्या विषयाचे विभागप्रमुख हे पद कायम असेल; पण स्कूलमधील समाविष्ट विषयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्कूल डायरेक्टर हे पद असेल. या पदावर सेवाज्येष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती केली जाईल. स्कूलमधील सर्व विभागांचे एकच कार्यालय राहील. यामुळे कर्मचारी व शिक्षकांच्या वर्कलोडची समस्याही राहणार नाही.